मराठी कविता

Saturday, May 28, 2005

I am Poet Borkar Speaking ...

Instructions: This is unicode text. Follow these instructions:
  • IE:Click on View Menu -> Encoding -> Select Unicode UTF-8
  • Firefox: Click on View Menu -> Character Encoding -> Select Unicode UTF-8.


"पु ल"
या दोन अक्षरांनी मराठी मनासाठी जे काही करून ठेवलं आहे त्याबद्दल काय लिहावे? पण आता मी बाळकृष्ण भगवंताने जे काही केलं आहे त्याबद्दल लिहीणार आहे. याची ओळखही म्या पामराला पुल-सुनिताबाईंनीच करून दिली त्यामुळे हा blog जो कोणी वाचेल त्याने "एक आनन्दयात्रा कवितेची" या ध्वनिमुद्रिका जरूर ऐकाव्यात.

आम्ही असे कधी-कधी ह्या कविता ऐकतो आणि ऐकतच राहतो. कधी डोळ्यांमधून आसवं गळू लागतात कळत नाही. विशेषतः पुल जेव्हा "निळी ये रजनी मोतिया सारणि" असं भैरवी मध्ये गाऊ लागतात तेव्हा एकदम डोळ्यांत आसवं. हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. पुन्हा बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे "भाग्य केवढे! आपुली चाले यातूनच यात्रा, आपुली चाले यातूनच यात्रा!" यावर विश्वास बसतो.

बा भ बोरकरांच्या कविता हा एक नितांत-सुन्दर विषय आहे. त्यांच्या कवितेबद्दल काही वेगळे लिहावे ही काही माझी प्रतिभा नव्हे, त्यामुळे मी त्यांच्या ज्या कविता पाठ केल्या आहेत त्या फक्त लिहिणार आहे.



जपानी रमलाची रात्र
चित्रवीणा
जलद भरुनी आले
घन लवला रे

तेथे कर माझे जुळती

मज लोभस हा इहलोक हवा

गीत तुझे गाता गाता

विझवून दीप सारे


जपानी रमलाची रात्र

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात

रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
(इथे पुलंनी म्हटलंय मदाचे, मधाचे नाही ते अगदीच व्हेजीटेरियन झालं)

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात !

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून ज़ाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा दिडदा दिडदा दिडदा

जलद भरुनी आले


घन लवला रे


तेथे कर माझे जुळती

मज लोभस हा इहलोक हवा

गीत तुझे गाता गाता

गीत तुझे गाता गाता मीच गीत झालो
प्रीत तुझी ध्याता ध्याता मीच प्रीत झालो

लागलो न भोगामागे वा तयास भ्यालो
हाक जागृतीची येता त्यातुनी निघालो

असा धुंद गोसावी मी ना कुणा कळालो
परी तुझ्या ज्योतिस्पर्शा भाळलो मिळालो

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुन अंती मी निवांत झालो

विझवून दीप सारे ...

विझवून दीप सारे मी चाललो निजाया
आता अशाश्वताची उरली मुळी न माया

मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे
तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे

स्वर-शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणि
आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणि

ध्वनि त्यांतुनी कुणि आगळा निघाला
त्याचाच छंद आता या लागला जिवाला

खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा
लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला

मिळुद्या मला मुळाशी सारी मिटुन दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हारे